कोरेगाव भीमातून अजित पवारांचा संकेत: शिंदेसेनेसोबत युती होण्याची शक्यता
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचं स्पष्ट झालं असून, दुसरीकडे भाजप आणि शिंदेसेना मात्र स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची शक्यता दिसत आहे. मात्र, शिंदेसेनेसोबत युतीबाबत अजित पवारांनी सकारात्मक संकेत दिले आहेत.
कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी झालेल्या २०८ व्या शौर्यदिनानिमित्त विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार पहाटे उपस्थित होते. यावेळी रिपब्लिकन पार्टीचे सचिन खरात, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी, सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अजित पवार म्हणाले की,
“१३ कोटी राज्यवासीयांच्या वतीने मानवंदना देण्यासाठी आलो असून, येणाऱ्या अनुयायांसाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने चांगली व्यवस्था केली आहे. निवडणुकीचे दिवस असतानाही राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे.”
“पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) एकत्र लढण्याबाबत आज उदय सामंत यांच्याशी चर्चा करणार आहे. ज्या ठिकाणी युती झाली आहे, तिथे काही जागा सोडण्यात आल्या आहेत. स्थानिक पातळीवर आघाड्याही होतील.” असेही अजित पवार म्हणाले.
दरम्यान, आरपीआयचे नेते सचिन खरात यांनी सांगितले की, कोरेगाव भीमा परिसराच्या विकासाबाबत अजित पवार यांच्याशी चर्चा झाली आहे. इतर विषयांवर चर्चा झाल्यानंतर माध्यमांशी बोलू.


Shinde_Rupali
