भाजपमध्ये निष्ठावंतांचा संताप, मेधा कुलकर्णींचीही नाराजी
छत्रपती संभाजीनगर, पुणे, अकोला, धुळे या महापालिकांसह राज्यभरात अनेक ठिकाणी भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा संताप पाहायला मिळत आहे. अनेक वर्षांपासून पक्षासाठी काम करणाऱ्यांना डावलून बाहेरून आलेल्यांना महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी दिल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. यावरून अनेक ठिकाणी पक्षाविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली. या पार्श्वभूमीवर आता भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनीही उघडपणे नाराजी व्यक्त करत पक्षाला सुनावले आहे.
उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तसेच अर्ज छाननीच्या दिवशी भाजपच्या इच्छुक उमेदवारांचा संताप उफाळून आला. छत्रपती संभाजीनगरमध्ये तर एका कार्यकर्त्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली. मंत्री अतुल सावे आणि माजी मंत्री भागवत कराड यांच्या गाड्यांना घेराव घालण्यात आला. काही ठिकाणी पक्षाच्या नेत्यांच्या गाड्यांना काळे फासण्यात आले, तर फोटोंनाही काळे फासण्यात आले.
राज्यातील अनेक महापालिकांमध्ये अशीच चित्रे पाहायला मिळाली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या भूमिकेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत स्थानिक नेत्यांना आणि पक्ष नेतृत्वाला थेट सवाल केले. या प्रकरणात आता भाजपच्या खासदार व माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनीही उडी घेतली आहे.
खासदार मेधा कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे,
“कुछ कह गए, कुछ सह गए… कुछ कहते-कहते रह गए.”
महापालिका निवडणुकीत भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर झालेल्या अन्यायावरून त्यांनी हा शेर पोस्ट करत अप्रत्यक्षपणे पक्षालाच सुनावले आहे. पोस्ट करताना त्यांनी सुरुवातीलाच “निष्ठावंत कार्यकर्ते” असा उल्लेख केला आहे.
राज्यातील अनेक महापालिकांमध्ये भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने कार्यकर्त्यांनी उघड संताप व्यक्त केला आहे. अनेक ठिकाणी इच्छुक उमेदवारांनी पक्षाच्या नेत्यांना जाब विचारला. मंत्र्यांवर आणि स्थानिक नेत्यांवर गंभीर आरोप करण्यात आले असून, या सर्व प्रकारांचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.


Shinde_Rupali
