पुणे महापालिका निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडी यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता. महायुतीच्या रणनीतीमुळे राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे.
पुणे:पुणे महापालिकेच्या मागील निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात समोरासमोर लढवलेल्या जागांपैकी ८५ जागांवर अत्यंत चुरशीची लढत झाली होती. त्यापैकी ५० जागा भाजपने, तर उर्वरित ३५ जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या होत्या.
जर त्या वेळी महायुती एकत्र लढली असती, तर या ८५ जागांवर एकच प्रमुख उमेदवार उभा राहिला असता आणि या सर्व जागांवर महाविकास आघाडीला सहज फायदा झाला असता. त्यामुळेच या जागांवरील लढत अत्यंत निर्णायक ठरली असती. सध्याच्या राजकीय परिस्थितीतही पुण्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत झाली, तरी शक्यतो विजय महायुतीचाच व्हावा, अशी रणनीती आखली जात असल्याचे चित्र आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातच सर्वाधिक लढती होतील, हे स्पष्ट झाले आहे. पुण्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडी यांच्यात किमान तिरंगी लढत होणार, असे संकेत मिळत आहेत.
दरम्यान, पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्यात युतीबाबत हालचाली सुरू असून, अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र, ही युती होण्याची शक्यता अधिक असल्याने पुण्यात तिरंगी लढत होईल, असा दावा वरिष्ठ नेत्यांकडून करण्यात येत आहे.
मागील महापालिका निवडणुकीत एकूण १६२ जागांपैकी बहुतांश जागांवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांच्या विरोधात लढले होते. त्यापैकी ८५ जागांवर दोन्ही पक्षांमध्ये काट्याची स्पर्धा झाली होती. या लढतींमध्ये भाजपने ५०, तर राष्ट्रवादी काँग्रेसने ३५ जागा जिंकल्या होत्या.
सध्याच्या प्रभागरचनेवर जुन्याच प्रभागरचनेचा प्रभाव कायम आहे. त्यामुळे महायुती म्हणून निवडणूक लढवली असती, तर या ८५ जागांवर प्रबळ उमेदवार बाजूला राहिला असता आणि त्याचा थेट फायदा महाविकास आघाडीला झाला असता. हीच शक्यता टाळण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांमध्ये महायुतीतून राष्ट्रवादी काँग्रेसला वेगळे ठेवण्याची रणनीती आखली गेल्याची चर्चा आहे.
मैत्रीपूर्ण लढत आणि सत्तेची शक्यता
आगामी महापालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्ष बहुतांश प्रभागांमध्ये आपापले उमेदवार देणार आहेत. मात्र, ज्या ठिकाणी भाजपला पोषक वातावरण आहे, तेथे राष्ट्रवादी सामंजस्याची भूमिका घेईल; तसेच ज्या ठिकाणी राष्ट्रवादीला फायदा होण्याची शक्यता आहे, तेथे भाजप सहकार्य करेल, असे राजकीय गणित मांडले जात आहे.
भाजप आणि शिवसेनेतील मतांची विभागणी टाळण्यापेक्षा महाविकास आघाडीतील मतांमध्ये फूट पाडण्यावर अधिक भर देण्यात आल्याचे दिसते. निवडणूक निकालानंतर आवश्यकता भासल्यास हे तिन्ही पक्ष सत्तेसाठी पुन्हा एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हिंदुत्ववादी मतांमध्ये फूट पडू नये, यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येण्यावरही विशेष लक्ष दिले जात आहे.
“पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांतील आमच्या सत्ताकाळात शहराचा चांगला विकास झाला आहे. आम्ही दोघे वेगवेगळे लढलो, तर तिसऱ्याचा फायदा होईल, हे समजण्याइतके राजकारण आम्हालाही कळते.”
— देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
दरम्यान, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यात सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे, असे शिवसेना (शिंदे गट) महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.


Shinde_Rupali
