महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसला मोठं बळ, प्रशांत जगतापांचा पक्षप्रवेश निश्चित?
ऐन महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठी हालचाल पाहायला मिळत आहे. काँग्रेस पक्षात लवकरच एका बड्या नेत्याचा प्रवेश होण्याची शक्यता असून, त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेसची ताकद वाढण्याची चिन्हे आहेत. अनेक वर्षांनंतर महापालिकांच्या निवडणुका होत असल्याने या निवडणुका सर्वच पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.
दरम्यान, निवडणुका जाहीर होताच राज्यात आघाडी व युतीच्या चर्चा वेग घेत असल्याचं चित्र आहे. मिळालेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाची भाजप व शिंदे गटाशी युती होणार नाही, त्या ठिकाणी अजित पवार गट शरद पवार गटासोबत हातमिळवणी करण्याची शक्यता आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतही असाच पर्याय पुढे येत असल्याची चर्चा आहे.
मात्र या संभाव्य युतीला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी तीव्र विरोध दर्शवला होता. त्यांच्या भूमिकेनंतरही दोन्ही गटांमध्ये युती होण्याची शक्यता कायम राहिल्याने अखेर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रशांत जगताप लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असून, त्यामुळे पुण्यात काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, “रोज नई सुबह होती है” असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रशांत जगताप यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. शरद पवार गटाचा राजीनामा दिल्यानंतरही आपण महापालिका निवडणूक लढवणार असल्याचं जगताप यांनी स्पष्ट केलं आहे. राजीनाम्यानंतर दोन्ही शिवसेना गटांकडून त्यांना पक्षप्रवेशाचे निमंत्रण देण्यात आले होते, मात्र वैचारिक भूमिकेमुळे ते काँग्रेसकडे झुकल्याचं सांगितलं जात आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपमध्ये जाणार नसल्याचं त्यांनी ठामपणे स्पष्ट केलं आहे.
दरम्यान मुंबईतील काँग्रेस भवनात पुणे महापालिका निवडणूक व जागावाटपाबाबत महत्त्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीला पुण्याचे प्रभारी सतेज पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विजय वडेट्टीवार उपस्थित आहेत. आजच प्रशांत जगताप मुंबईत दाखल झाल्याने काँग्रेसमध्ये त्यांचा प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे.

Shinde_Rupali